Sant Eknath Information in Marathi

संतश्रेष्ठ एकनाथ महाराज | Sant Eknath Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Sant Eknath Information in Marathi. 

शके 1450 ते 1455 च्या आसपास पैठणमधील एका अलौकिक अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांच्या पोटी एकनाथ महाराजांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. एकनाथांचे पणजोबा भानुदास हे एक थोर संत आणि विद्वान होते.

नाथांच्या आई-वडिलांनी त्यांच्या बालपणीच इहलोकीचा निरोप घेतला. आजोबा चक्रपाणि व आजी सरस्वती यांच्या मायाछत्राखाली त्यांचे संगोपन झाले. आजी-आजोबांनी त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले. आजोबांनी एकनाथांना अक्षरओळख आणि लिखाण शिकवले. वयाच्या सहाव्या वर्षी व्रतबंध झाल्यानंतर वेदाक्षरांशी परिचय व्हावा म्हणून नाथांच्या आजोबांनी पुराणिकबुवांची नियुक्ती केली.

एकनाथांची बुद्धिमत्ता लोकविलक्षण होती. चौकस बुद्धी, पाठांतरक्षमता आणि उत्तम स्मरणशक्ती असल्याने एकनाथ महाराज पुराणिकबुवांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असत आणि निरुत्तर करत असत. नाथांच्या शंकांचे निरसन करता करता पुराणिकबुवांची तारांबळ उडू लागली. त्यांचे समाधान करताना आपण अपुरे पडू की काय? अशी शंका त्यांना येऊ लागली. त्यामुळे पुराणिकबुवा नाथांच्या घरी येण्याचे टाळू लागले व हळूहळू त्यांचे घरी येणे बंदच झाले. या प्रकारामुळे आजी-आजोबा नाराज झाले.

भानुदासांचा पणतू विद्येविना राहिल्यास समाजात त्याची फजिती होईल, असे वाटल्याने एके दिवशी सकाळी आजोबा एकनाथांना खूप ओरडले. आजोबांच्या रागावण्यामुळे नाथ हिरमुसले झाले आणि घरातून बाहेर पडून गावातील शिवमंदिरात जाऊन बसले. काही वेळात त्यांना तिथेच झोप लागली. झोपेत असताना त्यांना एक आकाशवाणी ऐकू आली. ‘एकनाथा, उठ आणि तुझ्या गुरूकडे जा. तुझा जन्म मोठे कार्य करण्यासाठीच झाला आहे.’ ही आकाशवाणी ऐकताच एकनाथ खडबडून जागे झाले. मंदिरातील महादेवाला नमस्कार करून ते पैठण गाव सोडून निघाले.

आजी-आजोबांना भेटावे याचेदेखील त्यांना भान राहिले नाही. पैठणपासून काही अंतर दूर गेल्यावर विसाव्यासाठी एका झाडाखाली बसले असता अचानक एक वारकरी तेथे प्रकट झाला. तो वारकरी म्हणाला, ‘एकनाथा, मी पंढरी, मला माहीत आहे की, तू गुरूच्या शोधात बाहेर पडला आहेस. तुझे गुरू म्हणजे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दनस्वामी आहेत.’ एवढे बोलून तो वारकरी अंतर्धान पावला. आपले गुरू कोठे भेटतील याचे उत्तर त्यांना आता मिळाले होते.

इकडे तिरीमिरीत अचानक घर सोडून निघून गेल्यावर आजी-आजोबांसह सगळा गाव नाथांची शोधाशोध करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथांच्या घरी आजोबांना त्यांचा पत्ता सांगायला पंढरी नामक वारकरी आला. त्याने एकनाथ त्यांच्या गुरूकडे देवगिरीला गेल्याचे सांगितले. तसेच एकनाथांचा जन्म महान कार्यासाठी झाला असून, त्यांना गुरुगृही राहणे क्रमप्राप्तच असून, काही वर्षांनी ते स्वगृही परततील असेही सांगितले.

घर सोडल्यानंतर तीन दिवसांच्या पायपिटीनंतर एकनाथ देवगिरी किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी पहारेकऱ्यांना आपण जनार्दनस्वामींना भेटावयास आल्याचे सांगितले. जनार्दनस्वामींना भेटल्यानंतर त्यांनी पैठणमधील शिवमंदिरातील आकाशवाणी तसेच पंढरी नामक वारकऱ्याने सांगितलेला निरोप याबद्दल त्यांना सांगितले.

जनार्दनस्वामी जरी किल्ल्याचे अधिकारी असले तरी ते मूळचे धार्मिक व आध्यात्मिक वृत्तीचेच होते. त्यामुळे त्यांनी लगेच ओळखले की, साक्षात विठ्ठलानेच एकनाथांना त्यांच्याकडे पाठवले. आहे. एकनाथांच्या सदाचार, चिकाटी, अभ्यासूवृत्ती, श्रद्धा इत्यादी गुणांची पारख केल्यावरच त्यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले.

एकनाथ गुरुगृही राहू लागले. तेथे राहत असताना जनार्दनस्वामींच्या पत्नीला देखील घरकामात मदत करत असत. पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असे. जनार्दनस्वामी दिवसमर किल्ल्याच्या कचेरीच्या कामात व्यस्त असत. ते दररोज घरी ध्यानधारणा, देवपूजा याबरोबरच पौराणिक ग्रंथांचे पारायण देखील करत असत.

आपल्या गुरूंची सेवा करता करता नाथांनी किल्ल्यावरील वास्तव्यात आपल्या सदाचरणाने त्यांना जिंकले. हळूहळू किल्ल्यावरील कामकाजाची जबाबदारीसुध्दा जनार्दनस्वामींनी नाथांवर सोपविली. सुट्टीच्या दिवशी जनार्दनस्वामी आपला संपूर्ण वेळ ध्यानसाधनेत व्यतीत करत असत. त्यासाठी त्यांची विशिष्ट अशी एक जागा होती. त्यात सहसा कोणी व्यत्यय आणत नसे. [Sant Eknath Information in Marathi]

अशाच एका सुट्टीच्या दिवशी जनार्दनस्वामी साधनेस बसले असताना, अचानक शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्याची खबर आली. एकनाथांना ही खबर मिळताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सैन्याचे सेनापतीपद स्वीकारून शत्रूचा धुव्वा उडविला. दुसऱ्या दिवशी कचेरीत गेल्यानंतर युद्धाची सर्व कहाणी ऐकून जनार्दनस्वामी थक्क झाले. एकनाथांनी गुरूजवळ याविषयी ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. यानंतर जनार्दनस्वामींची नाथांवर विशेष निर्व्याज प्रीती जडली.

जनार्दनस्वामी आपल्या शिष्याची ध्यानसाधनेतील तसेच उपासनेतील रुची व प्रगती पाहून संतोष पावले. असेच एकदा ध्यानसाधनेला जाताना ते नाथांना बरोबर घेऊन गेले. साधनेला सुरुवात झाल्यावर काही वेळातच तेथे फाटक्या कपड्यातील, हातात कटोरा घेतलेला एक भिक्षुक आला. त्या भिक्षुकाने एकनाथांकडे पाहून जनार्दनस्वामींना असे सांगितले की, “जनार्दना, तुझा हा शिष्य थोर संत होणार आहे आणि त्याच्या हातून महान कार्य घडणार आहे. याच्या लिखाणाचा उद्धार पुढील अनेक पिढ्या करणार आहेत.” असे बोलून ती भिक्षुक व्यक्ती अंतर्धान पावली. ती व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून साक्षात दत्तगुरूच होते, असे जनार्दनस्वामींनी एकनाथांना सांगितले.

दत्तगुरूंचे दर्शन झाल्यानंतर एकनाथांनी अनुष्ठानास बसावे व स्वतः परमेश्वरास प्रसन्न करावे, असे जनार्दनस्वामींनी त्यांना सांगितले. आपल्या गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून देवगिरीनजीक शूलभंजन पर्वतावरील एका वृक्षाखाली ते डोळे मिटून ध्यानस्थ बसले. ते ध्यानधारणेत आत्ममग्न असताना दररोज त्यांच्या शरीराला वेटोळे घालून फणा काढून डोलणाऱ्या विषारी नागाचे अस्तित्व देखील त्यांना जाणवत नसे.

sant eknath information in marathi language

एक दिवस एका गुराख्याने ते दृश्य पाहिले आणि त्याचे पाणी पाणी झाले. भयाने त्याने किंकाळी फोडली. त्याबरोबर एकनाथ भानावर आले. काही क्षणातच त्या विषारी नागाने भगवान श्रीकृष्णाचे रूप धारण केले. एकनाथांना दर्शन दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण क्षणार्धात अंतर्धान पावले. भगवंताच्या भेटीमुळे आपले अनुष्ठान फळास आले आणि कालसर्पाच्या रूपात परमेश्वरच आपल्या एकाग्रतेची परीक्षा बघत होता, हे सुध्दा त्यांनी जाणले.

श्रीकृष्ण भेटीनंतर एकनाथ गुरुगृही परतले व त्यांनी इतिवृत्तांत आपल्या गुरूंना सांगितला. जनार्दनस्वामींनी एकनाथांना जवळ बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले. समाज व संस्कृती या गोष्टींशी परिचय झाल्यावर मगच स्वगृही पैठणला जाऊन पुढील कार्य सुरू ठेवण्यास सांगितले. ते स्वतः एकनाथांबरोबर त्र्यंबकेश्वरपर्यंत तीर्थयात्रेस गेले व तेथे त्यांनी एकनाथांचा निरोप घेतला.

  आइझॅक न्यूटन मराठी माहिती | Issac Newton Information in Marathi

त्यानंतर पुढे काही दिवस एकनाथांनी बारा ज्योतिर्लिंगे, गोकुळ, मथुरा, वृंदावन, गया, प्रयाग, काशी, बद्रिकाश्रम, द्वारका, गिरनार, जुनागड, डापूर वगैरे पवित्र तीर्थक्षेत्रांची भ्रमंती केली व सद्गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेल्यानंतर एका तपानंतर ते आपल्या मूळगावी म्हणजेच पैठण क्षेत्री परतले. ते येणार असल्याचे संकेत त्यांच्या आजी- आजोबांना मिळाले होते, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी ते आतुर होते.

गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. प्रपंच आणि परमार्थ साधत त्यांनी गिरिजाबाईशी संसार सुरू केला. बुद्धी आणि भावना यांचा संगम होऊन त्यांचा प्रपंच आदर्श झाला. त्यांना गोदावरी, हरी व गंगा अशी तीन अपत्ये झाली.

एक दिवस एक गरीब इसम आपल्या कन्येच्या विवाहासाठी म्हणून पैठणमध्ये लोकांकडे भिक्षा मागत होता. काही कर्मठ लोकांनी नाथांची फजिती करण्याच्या हेतूने त्या इसमास नाथांशी गैरवर्तन करण्यास सांगितले. ते केल्यावर त्याला दोनशे रुपये देण्याचे कबूल केले. नडीने त्रस्त असलेल्या त्या इसमाने नाथ पती-पत्नींशी हरप्रकारे गैरवर्तन केले तरी त्या उभयतांनी त्याचे आदरातिथ्यच केले. नाथांच्या शांत प्रवृत्तीमुळे त्या इसमास आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने त्या उभयतांची क्षमा मागितली.

नाथांनी त्याच्या वर्तनाचे प्रयोजन जाणल्यावर त्याला क्षमा करून त्याच्या मुलीच्या लग्नासाठी दोनशे रुपये देऊन निरोप दिला. पैठण क्षेत्री त्या काळी दंडवतस्वामी नामक एक साधक पुरुष राहत होते. त्यांना मृत व्यक्तीस जिवंत करण्याचा वर प्राप्त झाला होता, पण त्यांना याची जाणीव नव्हती. त्यांच्या अंगी असलेल्या या दैवी शक्तीमुळे जन्म व मृत्यू निश्चित करण्याच्या परमेश्वराच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचे पातक त्यांच्या हातून घडू नये म्हणून नाथांनी त्यांना मोक्षप्राप्तीसाठी समाधीचा सल्ला दिला. त्यानंतर नाथांना बराच उपहास सहन करावा लागला होता.

एके दिवशी एकनाथ महाराज गावातील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता एक कर्मठ व्यक्ती त्यांच्याशी हुज्जत घालत म्हणाली की, ‘एकनाथबाबा, तुम्ही तर माऊलींचेसुध्दा गुरू असल्यासारखे वागता आहात. माऊलींनी तर रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले होते. मग तुम्ही या देवळातील नंदीला चारा खायला घालू शकता का?’ त्यावर एकनाथ महाराजांनी शांतपणे महादेवाचे दर्शन घेतले व ते नंदीजवळ आले आणि त्यांनी गवताची पेंढी नंदीच्या मुखासमोर धरली.

त्या क्षणी तो दगडी नंदी एका जिवंत नंदीप्रमाणे उठून उभा राहिला. त्याने नाथांच्या हातातील गवताची पेंढी खाल्ली. नाथांभोवती एक प्रदक्षिणा घालून तो नंदी अंतर्धान पावला. तो दगडी नंदी जिवंत नंदीप्रमाणे उठून उभा राहिलेला पाहिल्यावर पांडित्याचा कोरडा गर्व मिरविणारे तर्कटही त्यांना शरण गेले आणि त्यांचे मतपरिवर्तन झाले.

एकनाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित हा सुध्दा एक हुशार विद्वान होता. संस्कृत भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व होते, पण गावातील काही कर्मठ लोकांमध्ये त्याची उठबस बसल्यामुळे त्याला एकनाथांचे विचार आणि वर्तन पटत नसे. तो स्वतः वर्णभेद मानत असे व संस्कृतमधील ग्रंथ मराठी भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचे त्यांचे कार्य त्याला पटत नसे.

नाथांच्या काळामध्ये संस्कृत भाषा ही देववाणी म्हणून प्रख्यात होती आणि ती केवळ ब्राह्मण वर्गापुरतीच मर्यादित होती. त्यांना वर्णभेद मान्य नव्हता. त्यांना चराचरात देव दिसत असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन अत्यंत उदार होता. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला सर्व वर्णाचे लोक येत असत. नाथांच्या या औदार्यामुळे जनसामान्यांना ते परमेश्वरासारखेच वाटत.

नाथांचा सदाचार अलौकिक होता. त्यांचा शब्द सत्य होता, परंतु त्यांचा आचार त्याहूनही सत्य होता. म्हणूनच नाथांसारखा दुसरा संत होणे नाही, हेच खरे! नाथ बोलघेवडे संत नव्हते, तर कृती करणारे संत होते. एकनाथांच्या कीर्तनात सर्वांना मुक्त प्रवेश होता.

एके दिवशी पैठणमध्ये राहणारी एक वेश्या कीर्तनास आली व कीर्तनाने प्रभावित होऊन तिने वेश्या व्यवसाय बंद करायचे ठरविले. एके दिवशी तिने नाथांना तिच्या घरी जेवायला यायची विनंती केली. नाथांनी तिचे आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर तिचे परिवर्तन होऊन ती धार्मिक झाली व भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करू लागली. जेवण आटोपून एकनाथ घरी पोहोचले, तोच त्यांचा मुलगा हरी क्रोधित झाला व एकनाथांना म्हणाला की, ‘देववाणीतील ग्रंथ तुम्ही लोकवाणीत आणता, अंत्यजांना घरी कीर्तनाला आणि प्रसादाला बोलावता हे काय कमी होते, म्हणून तुम्ही आज वेश्येच्या घरी जेवलात?’ हरीला सारी वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा सगळ्यांनी हरप्रकारे प्रयत्न केला, परंतु हरी काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता.

वर्णाश्रमाचा अभिमान असलेल्या हरी पंडिताला ब्राह्मण हेच श्रेष्ठ आहेत असे वाटत असे. त्यामुळे कर्मठ अशा हरी पंडिताला नाथांचे विचार पटत नसत. त्याने नाथांचा त्याग केला आणि तत्काळ घर सोडून काशीला जाण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगामुळे नाथांना आणि गिरिजाबाईंना अत्यंत दुःख झाले.

नाथांना मात्र वर्णाश्रमाची चौकट न मोडताही सर्वांचा उध्दार करता येतो आणि जनसामान्यांना सुध्दा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, हे भक्तीच्या माध्यमातून दाखवायचे होते आणि म्हणूनच कीर्तन- प्रवचनाद्वारे त्यांनी समाजप्रबोधनही केले. असे अनेक प्रसंग आहेत, ज्यातून त्यांची सद्विचाराची संपन्नता पहावयास मिळते.

एकनाथ महाराजांनी चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीवपद हस्तामलक, शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंदलहरी, गीतासार, आनंदानुभव असे अनेकविध ग्रंथ मराठीमध्ये आणले. अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळण, गोंधळ यांच्या साहाय्याने त्यांनी जनजागृती केली, तसेच आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधनही केले. कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोगाच्या तुलनेत भक्तियोग हा राजमार्गच आहे असे नाथांचे सांगणे होते.

त्यांच्या अंतिमसमयी त्यांनी ‘अध्यात्मरामायण’ या ग्रंथाचे लिखाण सुरू केले होते, जे मरणोत्तर त्यांच्या घरी रहायला आलेल्या एका गावबा नामक मठ्ठ व खादाड मुलाने पूर्ण केले. त्यांनी भक्त प्रल्हाद, ध्रुव, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता माळी यांची चरित्रे लिहिली. तसेच गुरुदेव दत्तात्रेय जन्म, हनुमान जन्म, तुलसी माहात्म्य वगैरे अशा अनेक पौराणिक कथाही लिहिल्या.

नाथांच्या भागवताने ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा यांच्याबरोबरच प्रस्थानत्रयीत मानाचे स्थान मिळविले आहे. भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्याचा प्रचार व प्रसार सर्वदूरपर्यंत केला.

एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताचे लिखाण सुरू केले होते. सुरुवातीचे काही अध्याय पूर्ण झाल्यावर पैठणमधील श्रीपादशास्त्री नामक विद्वान कीर्तनकार ते अध्याय घेऊन काशीला गेले व मणिकर्णिका घाटावर त्यावर कीर्तन करू लागले. काशीतील मराठी समजणारे लोक त्यांच्या कीर्तनास गर्दी करू लागले. तेथील काही कर्मठांना संस्कृतमधील वाङ्मय मराठीमध्ये आणलेले पटले नाही, म्हणून ते विरोध करू लागले.

  पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर  | Ahilyabai Holkar information in Marathi

त्या काळी काशीतील सर्व वैदिक शाळा, आश्रममठ इत्यादी कैवल्यानंद नामक मध्वसंप्रदायाच्या महान संन्यासी अधिकाऱ्याचा शब्द अंतिम मानत असत. कर्मठांनी त्यांची कैफियत मांडली. कैवल्यानंदांनी एकनाथांना त्वरीत काशीस येण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच ते धर्मसमेत हजर झाले. संस्कृतमधील पौराणिक ग्रंथातील शिकवणुकीची आजच्या समाजास कशी गरज आहे व लोकोपयोगासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी हे कसे गरजेचे आहे तेही त्यांनी पटवून दिले.

त्यानंतर कैवल्यानंदांनी एकनाथांना धर्मसभेमध्ये त्यांच्या लिखाणाचे वाचन करण्यास सांगितले. वाचन सुरू  होताच स्वतः कैवल्यानंद देहमान विसरून मंत्रमुग्ध झाले व त्यांनी एकनाथांना त्यांचा ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ काशी येथे पूर्ण करण्यास सांगितले. नाथांनी त्यांची आज्ञा प्रमाण मानून ३१ अध्यायांचा हा ग्रंथ काशी येथेच पूर्ण केला. सामान्यातला सामान्य आणि असामान्यातला असामान्यही त्यांच्या कर्तृत्वाला भुलला. भक्ती शक्ती आणि मुक्ती यांचा संगम आणि समन्वय घडवून भागवताचा उपदेश आयुष्यभर करून खऱ्या अर्थाने नाथांनी रूपकांच्या माध्यमातून जनजागरण केले.

नाथ हे क्रांतिकारक संत होते. समाजसुधारणा करण्यापूर्वी त्यांनी स्वतः कृती करून दाखविली आणि नंतरच समाजाला त्याप्रमाणे वागण्याचे आवाहन केले. सामाजिक समतेचा कोणताही डांगोरा न पिटता त्यांनी समता प्रस्थापित केली, तसेच स्वधर्म व स्वसंस्कृतीच्या रक्षणार्थ भक्तीच्या झेंड्याखाली हिंदूंचे संघटन करण्याचे कार्यही नाथांनी केले. आणि म्हणूनच समाजाला नाथ आपलेसे वाटले.

काशीवरून पैठणला परतल्यानंतर काही काळाने ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. दुसऱ्या दिवशी एकनाथ वारकऱ्यांसमवेत आळंदीस रवाना झाले आणि त्यांनी समाधीचा परिसर स्वच्छ केला. ज्ञानेश्वरांची समाधी ही संजीवन समाधी आहे. त्यामुळे तो चैतन्याचा पुतळा आजही तसाच पद्मासन घालून बसलेला आहे, अशी भक्तांची श्रध्दा आहे, धारणा आहे आणि म्हणूनच स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात ज्ञानेश्वर माऊली प्रकटले आणि त्यांनी एकनाथांना आशीर्वाद दिले.

हे नक्की वाचा: [Sant Eknath Information in Marathi]
लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र

एकनाथांचे वय वाढत चालले होते, तसेच त्यांच्या पत्नी गिरिजाबाई यांना देखील वार्धक्य आले होते. गिरिजाबाईंच्या सहवासात त्यांनी आदर्श प्रपंच कृतार्थ केला होता आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन तृप्त झाले होते. गिरिजाबाई आजारी पडल्यानंतर एकनाथांनी काशीला जाऊन हरीला त्याच्या आईच्या अंतिम भेटीसाठी घरी येण्याची विनंती केली. हरीने पुन्हा घरी परतण्यासाठी नाथांना दोन अटी घातल्या. एक कायमचे कीर्तन सोडणे आणि दुसरे परान्न सेवन न करणे. नाथांनी दोन्ही अटी मान्य केल्या व ते हरीला घेऊन घरी आले.

मुलगा, सून, नातवंडांची भेट झाल्यानंतर गिरिजाबाईंनी प्राण सोडला. एकनाथांनी देखील रोजचे कीर्तन बंद केले होते. त्यांची मनोमन कुचंबणा होत होती. पुढे काही दिवसानंतर हरीला त्याचे वडील हे एक साक्षात्कारी सत्पुरुष आहेत, याची जाणीव झाली आणि त्याला त्याची चूक लक्षात आल्यावर त्याने त्यांच्यावर लादलेल्या दोन्ही अटी काढून टाकल्या. त्यानंतर एकनाथ महाराज पूर्वीप्रमाणे कीर्तन आणि प्रवचन करू लागले. भगवंतकृपा व सद्गुरूकृपेने थोरपण लाभते यावर त्यांचा दृढविश्वास होता. अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करून त्यांनी त्यांची परंपरा दृढ राखली.

शके 1521 च्या फाल्गुन महिन्यात समाधी घेण्याचे नाथांनी निश्चित केले. त्यानंतर त्यांनी फाल्गुन महिन्यातील वद्य षष्ठीला त्यांचे अखेरचे कीर्तन केले. श्रीपादशास्त्री, हरी व इतर वारकरी त्यांच्या समाधीच्या वेळी हजर होते. नाथांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती, तसेच अंगावर शाल व उपरणे घेतले. काही लोक त्यांना समाधी न घेण्यासाठी परावृत्त करत होते, कोणी गंध लावत होते, तर कोणी फुले अर्पण करत होते. आपल्या लाडक्या संताचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

एकनाथांनी कीर्तनातून जन्म व मृत्यू आत्मा व पुनर्जन्म वगैरे गोष्टीविषयी प्रबोधन केले आणि जय जय रामकृष्ण हरी असे स्मरण करतच गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी यांनी देखील फाल्गुन वद्य षष्ठीसच देह ठेवला होता. आणि म्हणूनच नाथांच्या जीवनात फाल्गुन वद्य षष्ठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खऱ्या अर्थाने नाथांचे जीवन तृप्त झाले होते. नाथांच्या वाङ्मयरूपी महासागरात अनंत अनमोल रत्ने आहेत. प्रत्येक पद, ओवी आशयगर्भ व सदाचाराचा मार्ग दाखविणारी आहे. त्यांची थोरवी अशी आहे की, त्यांच्या कृतीचे सामाजिक व ऐतिहासिक अनुसंधान कधीही सुटले नाही. ज्ञानदेव, नामदेव तसेच रामदास व तुकाराम या संत परंपरेला जोडणारा अध्यात्म चैतन्याचा निरंजन सेतू म्हणजेच संतश्रेष्ठ एकनाथ महाराज होत.

सगुण आणि निर्गुण एकच आहे, हे नाथांनी त्यांच्या सदाचरणातून दाखवून दिले. नाथांचे आयुष्य जरी लौकिकार्थाने संपले असले तरी त्यांचे अलौकिक कार्य तसेच लिखाण अत्यंत प्रतिकूल काळातील असून देखील पिढ्यान्पिढ्या शतकानुशतके अजरामर राहिले आहे आणि असेच राहील, असा विश्वास आहे. नाथ झाले म्हणून महाराष्ट्र संस्कृती जिवंत राहिली आहे. [Sant Eknath Information in Marathi]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *