sant dnyaneshwar information in marathi

संत ज्ञानेश्वर महाराज | Sant Dnyaneshwar Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Sant Dnyaneshwar Information in Marathi. 

संत कृपा झाली । इमारत फळा आली ।।   
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।   

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।   

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

या वरील अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदाच्या उभारणीसाठी संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या योगदानाचे वर्णन केले आहे.

संतांची कृपा झाली वारकरी संप्रदायाच्या इमारतीची जडघडण झाली. संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया घातला. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला वैचारिक, तात्विक आणि आध्यात्मिक विचारांची अनमोल भेट दिली.

समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवण्याची शिकवण देऊन त्यांना एकत्र आणण्याचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ यांसारख्या महान ग्रंथांची रचना करून संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले केले.

त्या काळात सर्वसामान्य लोकांना ज्ञान मिळवण्याचा, देवाची भक्ती करण्याचा अधिकार नव्हता. संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य जनतेला ज्ञान मिळवण्याचा आणि भक्ती करण्याचा अधिकार मिळवून दिला. अशाप्रकारे संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायरुपी मंदिराची भक्कम पायाभरणी केली. या भक्कम पायामुळेच आज संपूर्ण वारकरी संप्रदायरुपी देवालयाचा डोलारा कायम टिकून आहे. 

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले. महारष्ट्रात महान संतांची परंपरा आहे आणि या संत परंपरेची सुरुवात ज्यांनी केली ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. आज या लेखात आपण संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहीती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

महाराष्ट्रातील संत परंपरेचा पाया असलेल्या संत ज्ञानेश्वराचं जीवनचरित्र जेंव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी लहान वयातच ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं अनाथ झाली. परंतु लहान आहेत म्हणून त्या काळातल्या समाजाला त्या लहान लेकरांची थोडीही दया आली नाही. संत ज्ञानेश्वरांना अगदी लहान वयातच खूप हालअपेष्टा सहन कराव्या. खूप दुःख सहन करावे लागले.

समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर बहिष्कार घातला होतो. समाजात वावरण्याचा त्यांना अधिकार नव्हता. एवढ्या लहान लेकरांना बहिष्कृत करून त्यांचा छळ करणाऱ्या त्या लोकांना त्यांची थोडीशीही दया आली नाही. तरीही संत ज्ञानेश्वर माउली अशा समाजातील सर्व लोकांसाठी, सर्व प्राणिमात्रांसाठी देवाकडे मागणे मागतात कि “जो जे वांच्छिल तो ते लाभो”.

किती महान होते ज्ञानेश्वर माउली. त्यांचं हृदय किती मोठं होत. एवढा छळ सहन करूनही, त्या लोकांसाठीच ज्ञानेश्वर माउली देवाकडे प्रार्थना करतात कि ज्यांना जे पाहिजे ते सर्व त्यांना मिळूदे. त्यामुळेच तर संत ज्ञानेश्वरांना माउली म्हटलं जातं. कारण मुल कितीही वाईट असलं तरी आई त्याच्यावर प्रेम करतेच. त्याप्रमाणेच समाज कितीही वाईट असला, त्यासमाजाने माउलींना बहिष्कृत केलं, त्यांचा छळ केला तरीही ज्ञानेश्वरांनी त्याच समाजाची काळजी केली आहे. खरंच संत ज्ञानेश्वर हि संपूर्ण जगाची माउली आहे असंच म्हणायला पाहिजे.

संत ज्ञानेश्वरांची माहिती | Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर माउलींच संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होतं. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या जवळ, गोदावरी नदीच्या काठावर असलेलं आपेगाव हे एक छोटंसं गाव आहे. या आपेगावत संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 रोजी झाला. संत ज्ञानेश्वर हे महान योगी, तत्वज्ञ आणि भागवत संप्रदायाचे संस्थापक होते.

sant dnyaneshwar information in marathi
sant dnyaneshwar information in marathi

संत ज्ञानेश्वर माउली तेराव्या शतकातील महान संत, तत्वज्ञ आणि कवी होते. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भागवतगीतावर भाष्य करणारा एक महान ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माउलींनी अमृतानुभव या ग्रंथाचीही रचना केली.

संत ज्ञानेश्वराच्या विचारात अद्वैतवादी वेदांत तत्वज्ञान आपल्याला दिसून येतो. विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगाभ्यासावर संत ज्ञानेश्वरांनी भर दिला आहे. संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या संतांना ज्ञानेश्वर माउलींकडूनच प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी परंपरेचे संस्थापक आहेत.

संत ज्ञानेश्वरांची थोडक्यात माहिती | Brief Information Sant Dnyaneshwar in Marathi

संपूर्ण नावज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्मई.स. १२७५ ,आपेगाव जि. औरंगाबाद (महाराष्ट्र)
आईचे नावरुक्मिणीबाई कुलकर्णी
वडिलांचे नावविठ्ठलपंत कुलकर्णी
गुरुश्री संत निवृत्तिनाथ महाराज
साहित्यरचनाज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग
संप्रदायनाथ संप्रदाय ,वारकरी संप्रदाय
कार्यसमाज उद्धार
समाधीमंदिरआळंदी जि.पुणे

संत ज्ञानेश्वर माउलींच बालपण | Sant Dnyaneshwar Mauli’s childhood

बाराव्या शतकात इ.स. १२७५ साली, श्रावण कृष्ण अष्टमी च्या दिवशी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते आणि त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. विठ्ठलपंत कुलकर्णी हे एक विरक्त संन्यासी होते.

विवाह केल्यानंतर विठ्ठलपंतांनी सन्यास घेतला होता. संन्यास घेऊन ते काशीला गेले होते. तेथे त्यांच्या गुरूला समजले कि ते विवाहित आहेत तेंव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत पाठवले आणि गृहस्थाश्रमाचे पालन करण्याची आज्ञा दिली.

  थॉमस एडिसन यांचे जीवनचरित्र | Thomas Edison Information In Marathi

गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये विठ्ठलपंतांना झाली होती.

संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आपेगाव या गावाचे कुलकर्णी होते. कुलकर्णी म्हणजे लेखापाल जे गावातील जमिनी आणि करांच्या नोंदी ठेवत असत. विठ्ठलपंतांना त्यांच्या पूर्वजांकडून परंपरागत हा वारसा मिळाला होता. विठ्ठलपंतांचा विवाह आळंदिचे कुलकर्णी असलेले त्यांच्या कन्येशी म्हणजेच रुक्मिणीबाईशी झाला होता. विठ्ठलपंतांना आध्यात्मिकतेची खूप आवड होती.

गृहस्थ जीवन जगात असतानाच विठ्ठलपंतांच्या मनात संसाराविषयी  विरक्ती निर्माण होत होती. शेवटी त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचे ठरवले आणि ते संन्यासी होण्यासाठी काशीला निघून गेले. काशीमध्ये विठ्ठलपंतांनी एका अध्यात्मिक गुरूकडून संन्यासाची दीक्षा घेतली. जेंव्हा त्यांच्या गुरूला कळले कि विठ्ठलपंतांचं लग्न झालेला आहे. तेंव्हा गुरूंनी विठ्ठलपंताना पत्नीकडे परत जाण्याचा आणि गृहस्थधर्म स्वीकारून कर्तव्ये पार पडण्याची आज्ञा दिली.

गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत परत आले आणि त्यांनी गृहस्थधर्म स्वीकारला आणि रुक्मिणीबाईंसोबत संसार करण्यास सुरुवात केली. रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत हे आळंदी येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर रुक्मिणीबाईंनी चार मुलांना जन्म दिला. एकदा संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थाश्रम स्वीकारून संसार सुरू करणे हे त्या काळातील समाजाला मान्य नव्हतं.

त्या काळातील रुढीप्रिय कर्मठ ब्राह्मणांना विठ्ठलपंतांचं संन्यासानंतर गृहस्थश्रम स्वीकारणे मान्य नव्हते. त्या रूढीवादी ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना पाखंडी ठरवलं होत. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला त्यांच्या जातीतून बहिष्कृत करण्यात आलं होत. त्यांना समाजात वावरण्याचा अधिकार नव्हता.

शेवटी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई आपल्या चार लहान मुलांना सोबत घेऊन गावाबाहेर एका छोट्याश्या झोपडीत राहू लागले. एकदा विठ्ठलपंत आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला गेले. एके दिवशी विठ्ठलपंत आणि त्यांची चार मुलं नित्य विधी करत असतानाच तेथे एक वाघ आला.

विठ्लपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुलं तेथून पळून गेली. परंतु निवृत्तीनाथ त्यांच्यापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपून बसले. गुहेत लपल्यानंतर निवृत्तीनाथांना नाथसंप्रदायाचे गहनीनाथ भेटले. गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि योगाचे शिक्षण दिले. त्यानंतर काही दिवसानंतर निवृत्तीनाथ घरी परतले होते.

त्यानंतर विठ्ठलपंत परत आळंदीला परत आले होते. आळंदीला परत आल्यावर विठ्ठलपंतांनी तेथील ब्राह्मणांना खूप विनवणी केली. ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्याचे साधन सुचवले. ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना जीवन त्याग करण्यास सांगितले.

संन्याशाची मुले असे म्हणून समाजातील कर्मठ लोक त्यांची अतिशय निष्ठूरपणे हाल करीत असत. लहान मुलांची केलेली उपेक्षा, विटंबना आणि हाल विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे.

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगात यावे या आशेने नदीत उडी मारून आपला जीव दिला. परंतु त्यांची हि अशा खोटी ठरली. देहत्याग करून प्रायश्चित करूनही त्यांच्या लहान मुलांचा छळ चालूच होता.

अशाप्रकारे ज्ञानेश्वर माउली आणि त्यांची भावंडं लहान वयातच अनाथ झाली. आणि रूढीवादी कर्मठ लोकांचा छळ आणि हालअपेष्टा सहन करत त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जीवन प्रवास | Life journey of Sant Dnyaneshwar Information in Marathi

आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर माउली आणि त्यांच्या भावंडांच जीवन अतिशय कष्टात आणि संघर्षात चालू होते. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे सर्व भावंडं खचली होती त्यावेळी निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन्ही लहान भाऊ आणि बहिणीचे सांत्वन केले.

आपल्या नातेवाईकांकडून कमीतकमी थोडा आधार तरी मिळावा म्हणून निवृत्तीनाथ आपल्या भावंडासोबत आपेगावला गेले. परंतु आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या अनाथ आणि बेघर मुलांसाठी आपल्या घराचे दरवाजे बंद केले.

त्यानंतर ही सर्व भावंडे परत आळंदीला गेली. आळंदी येथे गेल्यावर तेथील समाज त्यांचा स्वीकार करेल अशी अशा त्यांना त्यांना वाटत होती. परंतु तसे झाले नाही. आळंदीतही त्यांचा स्वीकार केला गेला नाही. त्याउलट त्या लहान मुलांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी आणि समाजात मान्यता मिळावी यासाठी पैठणला गेली. पैठणमध्ये ब्राह्मणसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धिपत्र मिळाले नाही.

sant dnyaneshwar information

ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ याना गहिनीनाथ यांनी दीक्षा देऊन कृष्ण भक्ती करण्याची आज्ञा दिली होती. पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना, सोपानदेवांनी आणि मुक्ताबाईंना दीक्षा देऊन योगप्रशिक्षण दिले होते. हे चारही भावंडं आता कृष्ण भक्ती करत होती.

त्याकाळात जवळपास सर्वच धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेत होते. सर्वसामान्य लोकांना संस्कृत येत नव्हते. त्यामुळे धर्मग्रंथांचे ज्ञान मिळवणे त्यांच्यासाठी अशक्यच होते. त्यामुळे वयाच्या १५ व्य वर्षी ज्ञानेश्वरांनी आपली मातृभाषा मराठीत गीतेवर भाष्य करायचं ठरवलं आणि ज्ञानेश्वरीची रचना केली.

ज्ञानेश्वरीलाच भावार्थदीपिका असेही म्हटले जाते. ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात ज्ञानेश्वरांनी भागवत गीतेचे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील देवीच्या मंदिरात केली होती. ज्ञानेश्वरी लिहिण्याचे काम त्यांचे शिष्य सच्चीदानंद बाबा यांनी केलं होत.

त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी अनेक महान रचना केल्या त्यापैकी प्रचलित म्हणजे अमृतानुभव, हरिपाठ, पसायदान इत्यादी. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला त्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्यांची सर्व भावंडे पंढरपूरला विठ्लाच्या दर्शनाला गेली. पंढरपूरला गेल्यावर ज्ञानेश्वरांची भेट संत नामदेव यांच्याशी झाली होती. नंतर संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे अतिशय जवळचे मित्र बनले होते.

संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव या दोघांनी मिळून भारतात असणाऱ्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची तीर्थयात्रा केली. भारतभर तीर्थयात्रा करत असतानाच ज्ञानेश्वरांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भक्ती रचना ज्या आज “अभंग” या नावाने प्रसिद्ध आहेत त्या या काळातच रचल्या आहेत असे मानले जाते.

सर्व कार्य पूर्ण झाल्यावर संत ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेण्याचे ठरवले.

संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतली | Sanjeevan Samadhi of Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर यांनी त्यांचे अवतार कार्य समाप्त केल्यावर संजीवन समाधी घेण्याचे ठरवले. संजीवन समाधी हि प्राचीन अष्टांग योगामध्ये असलेली स्वेच्छेने शरीर सोडण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये अतिशय खोल ध्यानस्थ अवस्थेमध्ये गेल्यावर शरीराचा त्याग केला जातो.

  पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर  | Ahilyabai Holkar information in Marathi

संत ज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी, इ.स. १२९६ या साली, इंद्रायणी नदीकाठी असलेल्या आळंदी येथे ध्यानस्थ अवस्थेत संजीवनी समाधी घेतली.

त्यांच्यानंतर काही वर्षातच निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनीही समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वर माउलींनी केलेले चमत्कार | Miracles by Sant Dnyaneshwar Information in Marathi

१. संत ज्ञानेश्वर माउली त्यांच्या भावंडांसोबत फिरत असताना त्यांना एक प्रेत दिसले तेंव्हा त्यांनी त्या प्रेताला जिवंत केले होते. त्या प्रेताला जिवंत केल्यावर त्यांनी त्याला सच्चीदानंद हे नाव दिले होते. पुढे हेच सचिदानंद ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले. याच सचिदानंद बाबानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्यास ज्ञानेश्वरांची मदत केली.

२. संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला शुद्धिपत्र घेण्यासाठी पैठणच्या विद्वानांकडे गेले होते. तेंव्हा तिथे त्यांची विटंबना करण्यात आली. तेंव्हा ज्ञानेश्वर माउलींनी त्या विद्वानांना विनवणी केली आणि वेदांमधील काही ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी सर्व चराचरांमध्ये एकच आत्मा वास करतो असे सांगितले होते. तेंव्हा बाहेरच एक रेडा होता.

त्या विद्वानांनी ज्ञानेश्वरांना सांगितले कि जर सर्वांमध्ये एकच आत्मा असेल तर मग त्या रेड्यामध्येही तुझा आत्मा असायला पाहिजे. मग त्या रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव असे म्हणून त्यांची थट्टा केली. तेंव्हा ज्ञानेश्वर यांनी त्या रेड्याच्या कपाळावर हात ठेवला आणि त्या रेड्याने वेद म्हणायला सुरुवात केली होती. अशाप्रकारे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून वेद वदवले होते.  

३. एकदा एक खुप महान योगी ज्यांचं नाव चांगदेव असं आहे. हे चांगदेव स्वतःला खूप महान समजत होते. चांगदेव हे त्यांच्या योग शक्तीने वाघावर बसून सवारी करायचे. चांगदेव यांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची ख्याती ऐकून त्यांना भेटण्यासाठी जाण्याचे ठरवले.

चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून जात होते. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी ठरवले कि एवढा महान योगी आपल्याला भेटायला येत आहे तर आपणसुद्धा त्यांना भेटायला गेले पाहिजे. तेंव्हा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका भिंतीवर बसून चांगदेवांनी भेटण्यासाठी गेली होती. असं म्हणतात कि ज्ञानेश्वरांनी भिंत हवेत उडवली होती.

४. एकदा ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाना मांडे खाण्याची इच्छा झाली होती. कसतरी करून त्यांनी मांडे बनवण्याचे साहित्य गोळा केले. परंतु नंतर त्यांच्या लक्ष्यात आले कि त्यांच्याकडे मांडे भाजण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या योग्य शक्तीने स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले होते.

हे नक्की वाचा:
1. लोकमान्य टिळक यांची माहिती
2. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची माहिती
3. अहिल्याबाई होळकर यांची माहिती

संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य | Work of Sant Dnyaneshwar Information in Marathi

1. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेने आणि कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मध्ये, नेवासे येथे भगवत गीतेवर प्रख्यात टीका ज्ञानेश्वरी लिहिली. खरे पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ही टीका सांगितली आहे आणि त्यांचे शिष्य सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिण्याचे काम केले आहे. याच ग्रंथाला ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असेहि म्हणतात.

ज्ञानेश्वरीत माउलींनी कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याबद्दलचे ज्ञान सांगितले आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एकूण ९००० ओव्यांचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’ प्राकृत मराठी भाषेत सांगितले आहे. आणि सर्वसामान्य लोकांसाठी ज्ञानाची दारे खुली केली होती.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेविषयी असणारा अभिमान आणि मराठी भाषेची महानता व्यक्त करताना खालील ओळींचा उल्लेख केला आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

2. विशुद्ध तत्वज्ञान, जीवब्रह्म ऐक्यावर भाष्य करणारा अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या ग्रंथात 800 ओव्या आहेत. हा ग्रंथसुद्धा तत्वज्ञाच्या दृष्टीने श्रेष्ठ आणि अतिशय महत्वाचा आहे.

3. महान योगी चांगदेव जो १४०० वर्षे जगला होता आणि त्याने खूप मोठी तपश्चर्या केली होती. परंतु चंगदेवाला खूप गर्व होता तो वाघावर बसून फिरायचा. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उपदेश करून त्याचे गर्वहरण केले होते. ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उपदेश करण्यासाठी एक 65 ओव्यांचे पात्र लिहिले होते. हे 65 ओव्यांचे पत्र आज चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथात ज्ञानेश्वरांनी अद्वैतवादी सिद्धांताचे अप्रतिम उल्लेख केला आहे.

4. संत ज्ञानेश्वरांनी हरिनामाचे महत्व सांगण्यासाठी हरिपाठाची रचना केली आहे.

संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले महान ग्रंथ | Books Written by Sant Dnyaneshwar in Marathi

  • ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)
  • अमृतानुभव
  • चांगदेव पासष्टी
  • स्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, इत्यादी)
  • हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)

सारांश : [Sant Dnyaneshwar Information in Marathi]

मला आशा आहे या लेखात ज्ञानेश्वरांची संपूर्ण माहीती तुम्हाला मिळाली असेल. या लेखात मी ज्ञानेश्वरांचा जन्म, ज्ञानेश्वरांच बालपण, ज्ञानेश्वरांचा जीवनप्रवास, ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य , ज्ञानेश्वरांनी केलेली साहित्य रचना आणि ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.

हा लेख आवडला असेल तर खाली कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून आम्हाला कळवा. आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *